Latest News

Latest News
Loading...

'रघुपती राघव राजाराम'च्या जयघोषात काँग्रेसचा सत्याग्रह; श्रीराम मंदिराच्या कथित देणगी गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी :-

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी निधीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर वणीत काँग्रेसने मंगळवारी आक्रमक भूमिका घेत 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन' छेडले. हनुमान मंदिर परिसरात भजन, आरती आणि सत्याग्रहानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वणी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली.

वणी तालुका काँग्रेस कमिटी आणि वणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. आंदोलनाची सुरुवात श्रीरामाच्या आरतीने व 'रघुपती राघव राजाराम' भजनाने करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण सत्याग्रह करून मंदिराच्या देणगी निधीशी संबंधित कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी श्रीराम मंदिरासाठी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणग्यांबाबत संपूर्ण पारदर्शकता राखली जावी, संबंधित आर्थिक व्यवहारांची वस्तुनिष्ठ चौकशी व्हावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका मांडली. मंदिरांवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वणी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार सादर केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व विकेश पानघाटे, जय आबड, श्यामा तोटावार, सुरज पुल्लेवार, रोहित मालेकर, सुधीर खंडाळकर, मोरेश्वर वासेकर, अशोक चिकटे, राजू अंकतवार, फरीद शेख, डॉ. प्रेम मेश्राम, अनंत डुंबारे आणि पांडुरंग पंडिले या काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांनी केले. 

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी प्रमोद वासेकर, ओम ठाकूर, वंदना आवारी, विवेक मांडवकर, प्रमोद लोणारे, वंदना धगडी, नीलिमा काळे, करुणा कांबळे, जयसिंग गोहोकार, सुरेश बन्सोड, राजेंद्र कोरडे, जगदीश चौधरी, सचिन पिदूरकर, पुंडलिक गुंजेकर, रवींद्र होकम, राजू काळे, तेजराज बोढे, ज्ञानेश्वर येसेकर, रविंद्र कांबळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.