Latest News

Latest News
Loading...

जंतर-मंतर लाठीचार्जाच्या निषेधार्थ काँग्रेसचा संताप; विद्यार्थ्यांवरील कारवाईची उच्चस्तरीय चौकशीची मागणी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने जनभावना दुखावल्या असून या घटनेचा वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनेही तीव्र निषेध नोंदविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या अशा कारवाईची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.

आंदोलनादरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा असल्याची भूमिका मांडली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर झाल्याचा आरोप गंभीर असून, अशा घटनांमुळे लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

निवेदनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात शांततामय आंदोलनांवर बळाचा वापर होणार नाही, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी "विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. लोकशाही, संविधान आणि न्यायाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष कायम राहील," असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

या वेळी ऍड. देविदास काळे, टीकाराम कोंगरे, विकेश पानघाटे, जय आबड, तेजराज बोढे, पुरुषोत्तम आवारी, वंदना आवारी, श्यामा तोटावार, वंदना धगडी, शालिनी रासेकर, जयसिंग गोहोकार, राजू अंकतवार, शंकर वऱ्हाटे, भाऊराव कावडे, मोरेश्वर पावडे, अनिल भोयर, रुपेश ठाकरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, मनीष खाडे, रवींद्र कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.