Latest News

Latest News
Loading...

**९७ लाखांच्या सराफा दरोड्याचा थरार अखेर संपला!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथील सराफा दुकान फोडून तब्बल ९७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राज्याबाहेरपर्यंत तपासाची सूत्रे हलवत आरोपींचा शोध घेतला आणि गुन्ह्यातील चारचाकी वाहनासह सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ६० लाख १० हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी पहाटे मोहदा येथील वर्मा ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ९७.५० लाखांचा ऐवज लंपास केला होता. या धाडसी चोरीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

यापूर्वी १४ जुलै रोजी मोहदा–मेटीखेडा मार्गावर रविंद्र कांबळे यांना अडवून काही जणांनी अंगठी व रोख रक्कम असा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या सलग घटनांमुळे पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. या प्रकरणाच्या तपासात शिरपूर पोलीस ठाण्यालाही विशेष जबाबदारी सोपविण्यात आली.

चार राज्यांत तपासाचे जाळे; तांत्रिक माहिती ठरली निर्णायक
गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी शिरपूर पोलिसांनी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पुणे येथे तपासाचे जाळे पसरवले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन पुणे परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते जप्त करण्यात आले.

दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा ६०,१०,८०२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

तपास कौशल्याची पुन्हा एकदा छाप
ठाणेदार संतोष मनवर यांनी यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे.  गुन्हे उघडकीस आणण्यातील अचूक नियोजन आणि माहितीदारांच्या सक्षम जाळ्यांसाठी ठाणेदार संतोष मनवर ओळखले जात असून त्यांच्याकडे गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची सूत्रे दिली जातात. क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात व गुन्हेगारांचा शोध लावण्यात त्यांनी वारंवार आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या बहुचर्चित दरोडा प्रकरणातही त्यांनी योग्य दिशेने तपास करत आरोपींपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तांत्रिक तपास, अचूक माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या बळावर तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले.

पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
या उल्लेखनीय कारवाईत ठाणेदार संतोष मनवर यांच्यासह पोलीस हवालदार इकबाल शेख, प्रशांत झोड, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे आणि प्रफुल नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हाभरातून या पथकाच्या धाडसी आणि कौशल्यपूर्ण तपासाचे कौतुक होत असून, या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

No comments:

Powered by Blogger.