मुख्यमंत्र्यांच्या शेर्याने वणी पोलिसांच्या आशेला बळ; नवीन पोलीस स्टेशन व निवासी वसाहतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
प्रशांत चंदनखेडे वणी :-
गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या पोलीस स्टेशन इमारती आणि अपुऱ्या निवासी सुविधांमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या वणी व शिरपूर पोलिसांना आता दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन पोलीस स्टेशन इमारत तसेच पोलीस निवासी वसाहतीस प्रशासकीय मान्यता व निधी मिळावा, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
पिदुरकर यांनी बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देऊन वणी व शिरपूर येथील पोलीस कार्यालये आणि निवासी इमारतींची दुरवस्था तसेच पोलिसांच्या अपुऱ्या निवास सुविधांचा प्रश्न मांडला होता. मुनगंटीवार यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्याचा शेरा मारला असून प्रकरण गृह विभागाकडे पाठविण्यात आले आहे.
वणी हे वाढती लोकसंख्या, व्यापारी उलाढाल आणि औद्योगिक विस्तारामुळे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना आधुनिक आणि सुसज्ज कार्यालयीन सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र विद्यमान पोलीस स्टेशनची इमारत जुनी असून पोलिसांसाठी उपलब्ध निवासी सुविधाही अपुऱ्या आहेत. शिरपूरची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या पोलिसांनाच मूलभूत सुविधा अपुऱ्या असतील तर सक्षम पोलीस व्यवस्था उभी राहणार कशी? असा सवाल उपस्थित करत पिदुरकर यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे. पोलिसांना मानसिक आणि भौतिकदृष्ट्या सक्षम वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यासाठी आधुनिक कार्यालय आणि पुरेशा निवासी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानंतर हा प्रस्ताव गृह विभागाच्या स्तरावर पोहोचला असून, प्रशासकीय मान्यता आणि निधी मंजुरीच्या पुढील कार्यवाहीकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
“पोलिसांना योग्य सुविधा मिळवून देणे ही केवळ मागणी नसून समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे. जोपर्यंत वणी व शिरपूर येथील पोलीस कार्यालये आणि निवासी वसाहतींचा प्रश्न प्रत्यक्ष मार्गी लागत नाही, तोपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील,” अशी भूमिका विजय पिदुरकर यांनी व्यक्त केली.

No comments: