Latest News

Latest News
Loading...

लालपुलियात रस्त्यावर ट्रक उभे केल्यास थेट कारवाई!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

लालपुलिया परिसरातील कोलडेपो, कोळसा प्लॉट, ट्रान्सपोर्ट, गॅरेज, स्पेअर पार्ट्स दुकाने व अन्य व्यावसायिकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. व्यवसायाच्या नावाखाली रस्त्यावर ट्रक उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास यापुढे थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार संजय देरकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत देण्यात आला.

लालपुलिया परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठी वर्दळ असते. कोलडेपो, गॅरेज व ट्रान्सपोर्ट प्रतिष्ठानांसमोर रस्त्यावरच ट्रक उभे केल्याने वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे दुकान, गॅरेज अथवा प्रतिष्ठानासमोर रस्त्यावर ट्रक उभा केलेला आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली.
कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावर साचणारी काळी भुकटी व माती हा देखील बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. रस्त्यावर माती साचल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या प्रतिष्ठानासमोरील रस्ता स्वच्छ ठेवावा, माती साचू देऊ नये आणि धुळीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या.

कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री व्यवस्थित बांधणे बंधनकारक असून, ताडपत्रीची खात्री केल्यानंतरच वाहन बाहेर सोडावे, असेही स्पष्ट करण्यात आले. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ब्रेकरची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली.

“नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रथम समज द्या; मात्र वारंवार नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता नियमानुसार कारवाई करा. व्यवसाय सुरू राहिला पाहिजे, पण त्याचा त्रास नागरिकांना होता कामा नये,” अशी स्पष्ट भूमिका आमदार संजय देरकर यांनी मांडली.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, ठाणेदार भानुदास पिदुरकर, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यासह लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, गॅरेज चालक, स्पेअर पार्ट्स विक्रेते व अन्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीतून देण्यात आलेल्या स्पष्ट इशाऱ्यामुळे लालपुलियातील बेशिस्त वाहतूक, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकांचा प्रश्न आणि धुळीच्या समस्येला आता कितपत आळा बसतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.