प्रशांत चंदनखेडे वणी :-
तब्बल २१ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली वणी–उकणी बससेवा अखेर सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न घेऊन कामगार नेते संजय खाडे यांनी केलेल्या आंदोलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मंगळवारपासून या मार्गावर नियमित बस धावू लागली.
बससेवेच्या पहिल्याच फेरीत संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रवास करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चालक व वाहकांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
बससेवेअभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. शाळा-महाविद्यालयासाठी त्यांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे वेळ, सुरक्षितता आणि आर्थिक खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न घेऊन खाडे यांच्या नेतृत्वाखाली पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत बससेवा सुरू केली. उकणी, जुनाड, पिंपळगाव, बोरगाव, भालर वसाहत आणि भालर या गावांतील विद्यार्थी व नागरिकांना या बससेवेचा थेट लाभ होणार आहे.
“बससेवा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज आहे. जनतेचा प्रश्न केवळ कागदावर न ठेवता तो मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा केला. अखेर २१ वर्षांची प्रतीक्षा संपल्याचे समाधान आहे.”
— संजय खाडे, कामगार नेते
ग्रामस्थांच्या दीर्घ संघर्षाला अखेर यश मिळाले असून, बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेला आता सार्वजनिक वाहतुकीचा आधार मिळाला आहे.


No comments: