प्रशांत चंदनखेडे वणी :-
वाढता उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने यावर मात करून कमी खर्चात अधिक उत्पादन व नफा मिळविण्याच्या उद्देशाने ‘विज्ञान संत श्री. अंकुश पाटील कृषितंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा व शेतकरी मेळावा’ आयोजित करण्यात आला. मजरा (नांदेपेरा रोड) येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतीवरील वाढता खर्च कमी करून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. यावेळी शेतकऱ्यांना अल्प खर्चात घरच्या घरी वॉटर सोल्युबल खते, कृषी संजीवके, कीटकनाशके आणि बुरशीनाशके तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच या निविष्ठांचा योग्य वापर, पिकांचे व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या विविध उपाययोजनांबाबत शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आले.
सांगलीचे विज्ञान संत श्री. अंकुश पाटील, यवतमाळचे रमेशराव जरांडे तसेच एसआरटी शेती मार्गदर्शक उमेश पोहदरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती अधिक फायदेशीर करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रभाकर चिकटे, पांडुरंग हेपट, अशोकराव वानखेडे, अनिलराव देऊळकर, प्रेमानंद धानोरकर, संजय धांडे, प्रविण मत्ते, प्रफुल गोरे, दिलीपराव पेचे, मोहन डोंगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कमी खर्च, योग्य तंत्रज्ञान आणि अधिक उत्पादनाच्या माध्यमातून शेतीला नफ्याचा व्यवसाय बनविण्याची नवी दिशा या कार्यशाळेतून मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

No comments: