प्रशांत चंदनखेडे वणी :-
ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र सण शहरात उत्साह, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. एकमेकांच्या गळाभेटी घेत शुभेच्छांची देवाणघेवाण होत असतानाच विविध सामाजिक उपक्रमांनी ईदचा आनंद द्विगुणित केला.
ईदचे औचित्य साधून आमेर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते जमीर खान यांनी गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबविला. विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. मोमीनपुरा येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकली प्रदान करण्यात आल्या.
गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेताना अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज पायपीट करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन जमीर खान यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देण्यासाठी सायकलींची मदत केली. सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाचणार असून, त्याचा उपयोग त्यांना अभ्यासासाठी करता येणार आहे.
नवीन सायकल हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचे खरे फलित ठरले. ईदचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाची आणि शिक्षणाची नवी वाट निर्माण करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला आहे.
जमीर खान यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत असून, ‘ईदची खरी मिठास माणुसकीतच’ असल्याचा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचला.

No comments: