Latest News

Latest News
Loading...

गोवंश तस्करीवर पोलिसांचा घाव! भरधाव वाहनांचा पाठलाग अन् आत सापडले चार बैल; ११.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी :-

रुटमार्च आटोपून परतणाऱ्या पोलिसांना पाहताच समोरून येणाऱ्या दोन मालवाहू वाहनांनी अचानक वेग वाढवला. पोलिसांचा संशय बळावला आणि सुरू झाला पाठलाग... अखेर चारगावजवळ दोन्ही वाहने अडवून तपासणी केली असता वाहनांमध्ये दाटीवाटीने बांधलेले चार बैल आढळून आले. शिरपूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चार बैलांची सुटका केली, आणि दोन मालवाहू वाहनांसह ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनात कायर येथे रुटमार्च करून पोलिसांचे पथक शिरपूरकडे परतत होते. दरम्यान, ग्राम चारगावजवळ दोन मालवाहू वाहने भरधाव वेगाने येताना पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांचे वाहन दिसताच चालकांनी वाहने मागे वळवून वेगाने जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांना संशय आला. पथकाने तातडीने पाठलाग करून दोन्ही वाहने थांबवली.

वाहनांची झडती घेताच पोलिसांनाही धक्का बसला. प्रत्येक वाहनात दोन याप्रमाणे चार बैल निर्दयीपणे बांधून ठेवलेले होते. पोलिसांनी वाहनातील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शनिदेवा शिवशंकर पांडे, बादल खुशाल नगराळे, रंजीत सुभाष कनाके आणि साहील बंडू खोके अशी सांगितली.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे बैल वरोरा येथून खरेदी करून तेलंगणातील बेला येथे सलीम कुरेशी याच्याकडे नेले जात असल्याचे समोर आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी चार बैल किंमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये, दोन मालवाहू वाहने किंमत सुमारे १० लाख रुपये, असा एकूण ११.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चारही बैलांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांना रासा येथील गोसंरक्षण संस्थेत सुरक्षिततेसाठी दाखल करण्यात आले.

याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेत पाचव्या संशयिताविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यासह संबंधित कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार संतोष मनवर यांच्या आदेशावरून पोलीस पथकाने केली.

पोलिसांची नजर चुकवून सुरू असलेली वाहतूक, पोलिसांना पाहताच वाहनांचा वाढलेला वेग आणि त्यानंतरचा पाठलाग—या थरारक कारवाईत अखेर चार बैलांची सुटका झाली. शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध गोवंश वाहतुकीचा प्रयत्न उधळून लावण्यात आल्याने परिसरात पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.