गॅरेजसाठी ८५ हजार मागितले; पुन्हा ४५ हजारांची मागणी, पैशासाठी विवाहितेचा अनन्वित छळ, पतीने घराबाहेर काढल्याची तक्रार
गॅरेज सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी आणि चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याचा आरोप एका विवाहितेने केला आहे. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेचे लग्न जानेवारी २०२४ मध्ये बोरगाव मेघे जि. वर्धा येथील युवकासोबत झाले. लग्नानंतर काही महिन्यांनी पतीने गॅरेज सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगितल्याचे महिलेचे म्हणणे आहे. माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगूनही तिच्यावर कथितरीत्या दबाव टाकण्यात आला. अखेर संसार सुरळीत राहावा म्हणून माहेरच्यांनी ८५ हजार रुपये दिले.
त्यानंतर काही काळ सांसारिक जीवन सुरळीत चालले. मात्र काही दिवसांनी पुन्हा पैशांची मागणी सुरू झाली. तसेच आजारपणावरून टोमणे मारणे, चारित्र्यावर संशय घेणे आणि मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. पतीसह सासरच्या काही नातेवाइकांनी माहेरहून आणखी ४५ हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला. तसेच महिलेच्या पतीला तिच्याविरुद्ध वेळोवेळी भडकावण्यात आले. नातेवाईकांच्या भडकावण्यावरून पती नेहमी शिवीगाळ व मारहाण करू लागल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, २९ जून रोजी घरातील कामाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर सासू, भासरा व नणंद यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर पतीनेही मारहाण करून घराबाहेर काढल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर महिला आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी वणी येथे आली. पतीने परत घेऊन जाण्यास नकार दिल्यानंतर तिने ७ जुलै रोजी वणी पोलिसांत लेखी तक्रार केली होती. प्रकरण महिला समुपदेशन केंद्र, पांढरकवडा येथे गेले; मात्र तेथे समझोता न झाल्याने अखेर महिलेने २९ ऑगस्ट रोजी पोलिसांत जबानी तक्रार दिली.
महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी साजिद अली सैय्यद अली (३५), शाहिद अली सय्यद अली (३८), अरसीया शाहिद अली (३२), सय्यद अली अजगर अली (७०), बिल्किसबानो सैय्यद अली (६०) सर्व रा. बोरगाव मेघे वर्धा, रुकसार नियाज अली (३२) रा. रजानगर वणी, नियाज अली ताहेर अली (३६) रा. रजानगर वणी यांच्या विरुद्ध बीएनएसच्या कलम ३(५), ८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पैशांची मागणी, मारहाण आणि मानसिक छळाच्या या आरोपांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

No comments: