प्रशांत चंदनखेडे वणी :-
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अवैधरित्या साठा करून त्याची विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरून यवतमाळ जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने शहरातील फाले ले-आऊट येथील एका घरावर धाड टाकून तब्बल ३ लाख ५१ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला आहे. एफडीएची शहरातील ही मोठी कारवाई असून या कारवाईने सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. शहरातील एका अवैध विक्रेत्याने घरात सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अवैध साठा करून ठेवला असून तो मुबलकपणे छोटे व्यावसायिक व पानटपरी चालकांना पुरवत असल्याचा सुगावा लागताच एफडीएच्या यवतमाळ पथकाने ३० ऑगस्टला दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास त्याठिकाणी शिताफीने धाड टाकली. या कारवाईने शहरातील गुटखा माफियांचे तस्करी नेटवर्क उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचे साठे व विक्री करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर धडक कारवाईची मोहीम उघडली असून या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनही सज्ज झालं असून गुटखा माफियांच्या हालचालींवर प्रशासन बारीक लक्ष ठेऊन आहे. वणी शहरात सुगंधित तंबाखू व गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची अनेक दिवसांपासून ओरड सुरु आहे. शहरात सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करणारे अवैध विक्रेते मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याच्या तक्रारी वाढल्याने यवतमाळ जिल्हा अन्न व औषध प्रशासन वणी येथील अवैध विक्रेत्यांवर पाळत ठेऊन होते.
अशातच शहरातील फाले ले-आऊट येथील एका घरात सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अवैधरित्या साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती एफडीएच्या यवतमाळ विभागाला मिळाली. या माहितीवरून यवतमाळ एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संशयित घरावर धाड टाकली असता तेथे सुगंधित तंबाखू व गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्या घरातून तब्बल ३ लाख ५१ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी मुनाल नवनाथ वेलेकर रा. फाले ले-आऊट याच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईने शहरात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व साठा करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पुढील तपास सुरु आहे.

No comments: