राजूर कॉलरी परिसरात नालीत खरकटे टाकण्याच्या किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद हिंसक वळणावर पोहचला. वादात मध्यस्थी करणाऱ्या कुटुंबातील महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार करण्यात आल्यानंतर या घटनेची पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. या प्रकरणी मायलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार विमल उईके या राजूर कॉलरी परिसरात आपल्या नातवासोबत राहतात. त्यांच्या घराजवळ सुनंदा आत्राम या कुटुंबासह राहतात. नालीत खरकटे टाकण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुनंदा आत्राम यांनी घरासमोरील नालीत शिळे अन्न टाकले. यावर विमल उईके यांनी नालीत खरकटे टाकू नका, असे सांगितल्याने वाद सुरू झाला. यावेळी त्यांची मुलगी सारिका यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्याचवेळी सुनंदा आत्राम यांचा मुलगा मुकेश याने हातातील लोखंडी रॉडने सारिका यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमी सारिका यांना बाजूला केले. त्यानंतर शेजारी स्वप्नील उईके व त्यांच्या पत्नीने वाहनातून त्यांना वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे रेफर केले.
सारिकावर चंद्रपूर येथे उपचार केल्यानंतर विमल उईके (६५) यांनी घडलेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुकेश आत्राम व सुनंदा आत्राम या मायलेकावर बीएनएसच्या कलम ११८(२), ३(५), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: