विठ्ठलवाडीत चिमुकलीवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला; गालाला गंभीर इजा! भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक हैराण
शहरातील विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) रात्री ९ वाजताच्या सुमारास घराजवळील हनुमान मंदिर परिसरात सवंगड्यांसोबत खेळत असलेल्या एका चिमुकलीवर अचानक कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने तिच्या गालाला करकचून चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. जखम मोठी असल्याने तिला आधी चंद्रपूर येथे, तर नंतर नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असून, नागपुरात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी चिमुकली ही गुरुदेव अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापक गणेश तुराणकर यांची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमका कोणता कुत्रा? संभ्रम कायम
चिमुकलीवर हल्ला करणारा कुत्रा भटक्या होता की परिसरातील एखाद्या नागरिकाचा पाळीव कुत्रा, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. लहान मुलांवर अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता पालकांमध्येही चिंता वाढली आहे.
विठ्ठलवाडी, गौरकार कॉलनीत कुत्र्यांचा हौदोस
विठ्ठलवाडी परिसरासह गौरकार कॉलनीतही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रमुख रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे धावणे, पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांचा पाठलाग करणे, अशा घटना नियमित घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अनेकदा नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला; मात्र प्रसंगावधान राखल्याने काही जण थोडक्यात बचावले. त्यामुळे या समस्येचा केवळ उपद्रव म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न म्हणून विचार करण्याची वेळ आली आहे.
नसबंदी मोहिमेनंतरही समस्या कायम
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी कुत्र्यांची नसबंदी मोहीम राबविली होती. मात्र त्यानंतरही कुत्र्यांची संख्या आणि उपद्रव कमी झाल्याचे चित्र दिसत नसल्याने नागरिकांकडून प्रभावी उपाययोजनांची मागणी होत आहे.
चिमुकलीवरील हल्ल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांची परिणामकारकता आणि शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी नगरपालिकेने तातडीने प्रभावी आणि नियमबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

No comments: