Latest News

Latest News
Loading...

वनोजादेवीच्या वर्गखोलीतून थेट ब्रिस्टॉलच्या ज्ञानविश्वात!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेपासून इंग्लंडमधील जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल (University of Bristol) पर्यंतचा संदीप संजय गोहोकार यांचा ज्ञानप्रवास ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. वनोजादेवी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संदीप गोहोकार यांची महाराष्ट्र शासनाच्या नामांकित परदेशी शिष्यवृत्ती २०२६-२७ साठी निवड झाली असून त्यांनी ब्रिस्टॉल विद्यापीठातील Master of Development Studies (MSc) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम निवडला आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्यविकास, उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या ध्येयाने गोहोकार यांनी युवकांच्या माध्यमातून सातत्याने काम केले. ‘युवाशक्ती’च्या माध्यमातून शैक्षणिक जागृती, कौशल्य विकास शिबिरे, उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले.

आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, बचतगट व युवकांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत Universal Youth Leadership Summit, Indonesia या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठीही त्यांची निवड झाली होती.

शिक्षक म्हणून वनोजादेवी शाळेत कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवांना शिक्षणाशी जोडत त्यांनी ‘स्टुडंट स्टडी रूम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमाची दखल BBC Marathiने घेतली होती.

University of Bristol मध्ये विकासाच्या जागतिक संकल्पना, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समानता यांचा अभ्यास करून हे ज्ञान ग्रामीण व वंचित समाजाच्या विकासासाठी वापरण्याचा संदीप गोहोकार यांचा मानस आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक शैक्षणिक यश न राहता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक पंख देणारी प्रेरणादायी वाटचाल ठरणार आहे.

या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक, कुटुंबीय आणि ‘युवाशक्ती’तील सहकाऱ्यांना दिले आहे. ग्रामीण परिस्थिती ही मर्यादा नसून योग्य ध्येय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर जागतिक स्तरावरही संधी मिळविता येते, हा संदेश देणारी ठरली असून त्यांच्या यशातून हे अधोरेखितही झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.