प्रशांत चंदनखेडे वणी :-
गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नव्हे, तर समाजाला एकत्र आणणारे आणि बंधुभावाची वीण घट्ट करणारे पर्व. याच भावनेचा प्रत्यय वणी तालुक्यातील चिखलगाव-बोधेनगर येथे यंदाच्या गणेशोत्सवात आला. ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून श्री बाल गणेश उत्सव मंडळाने संपूर्ण गावाला एका धाग्यात बांधत गणेशोत्सवाचा सामाजिक आदर्श निर्माण केला. मंडळाचे अध्यक्ष गणेश बदखल यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवस विविध भक्तिमय उपक्रम उत्साहात पार पडले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गावात एकाच गणरायाची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. दहा दिवसांच्या कालावधीत गावात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, उत्सवाला कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला, वादाला अथवा तंट्याला थारा न देता ग्रामस्थांनी एकदिलाने सहभाग घेतला. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ मंडळाचा न राहता संपूर्ण गावाचा उत्सव बनला.
महाप्रसादातून सामाजिक एकतेचा संदेश
शुक्रवारी श्री बाल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा तब्बल २ हजार नागरिकांनी लाभ घेतला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या उपक्रमातून ‘आपण सर्व एकाच गावचे, एकाच कुटुंबाचे’ ही सामाजिक भावना अधिक दृढ झाली.
गणेशोत्सवादरम्यान ग्रामस्थांनी दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग हा गावातील सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा ठरला. उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच परस्पर स्नेह, सहकार्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना ठरतेय आदर्श
दहा दिवसांच्या भक्तिमय सेवेनंतर लाडक्या गणरायाच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. बाप्पाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यांत भावूकता असली, तरी मनात दहा दिवसांच्या उत्सवातून मिळालेल्या आनंदाचे समाधान आहे.
आजच्या काळात उत्सवांच्या माध्यमातून समाजात मतभेद निर्माण होण्याऐवजी एकजूट, शांतता आणि बंधुभाव वाढविण्याची गरज आहे. चिखलगाव-बोधेनगर येथील ‘एक गाव, एक गणपती’चा उपक्रम हीच सकारात्मक दिशा दाखवितो. गणरायाच्या भक्तीबरोबरच माणुसकी, एकोपा आणि सामाजिक सलोखा जपला, तरच उत्सवाचे खरे सार्थक होते, असा संदेश या गणेशोत्सवातून ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments: