आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जन्मदात्या वडिलांवरच मुलाने काठीने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना गोकुळनगर, वणी येथे घडली. मुलाच्या मारहाणीत वृद्ध वडिलांच्या उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. उपचारानंतर त्यांनी वणी पोलिस ठाणे गाठून मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली.
नरेश रूपाजी एकनार (६५), रा. गोकुळनगर, वणी हे गेल्या २० वर्षांपासून नंदी बैल घेऊन गावोगावी फिरत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी नंदी बैल घेऊन घरी जात असताना अरुंद बोळीत बैलाचा धक्का शेजारील महिलेच्या घराच्या कंपाउंडवरील टिनपत्र्याला लागला. यावरून महिला प्रचंड चिडली आणि तिने नरेश यांना खडेबोल सुनावले.
याच वेळी नरेश यांचा मुलगा संतोष एकनार याने घरातून काठी आणून वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मारहाणीत नरेश यांच्या हाताला दुखापत झाली. दुसऱ्या दिवशी हाताला सूज व वेदना वाढल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २२ सप्टेंबर रोजी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर नरेश एकनार यांनी थेट वणी पोलिस स्टेशन गाठून मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याकरिता तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलावर बीएनएसच्या कलम ११८(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट जन्मदात्या वडिलांवरील हल्ल्यापर्यंत पोहोचला. मुलाने किरकोळ कारणावरून थेट वृद्ध वडिलांवरच काठी उगारल्याने कौटुंबिक नात्यांतील वाढता तणाव परत एकदा चव्हाट्यावर आला आहे.

No comments: