प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी, वणी नॉर्थ आणि माजरी क्षेत्रातील प्रकल्पबाधित शेतकरी, रोजगार, पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) चे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांच्यासोबत नागपुरातील CMD कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. डॉ. पांडे यांनी ८ मे २०२६ रोजी WCLच्या CMD पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
बैठकीत जमीन संपादन, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला, पुनर्वसन, रोजगार आणि प्रलंबित रोजगार प्रकरणांचा निपटारा या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. माजरीतील प्रस्तावित शिवनी प्रकल्प, वणी नॉर्थमधील कोलेरा-पिंपरी पुनर्वसन तसेच वणी क्षेत्रातील कोलगाव विस्तारीकरण, मुंगोली व साखरा येथील प्रकल्पबाधितांचे प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आले.
प्रकल्पबाधित पात्र उमेदवारांना शक्यतो त्याच प्रकल्पात किंवा जवळच्या WCL क्षेत्रात रोजगार देण्यात यावा. शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र SOP तयार करण्याची मागणीही करण्यात आली.
वणी–यवतमाळ मार्गाला जोडणारे रस्ते, भांदेवाडा–राजूर आणि जुनाड फाटा–उकणी खदान रस्त्यांची कामे गतीने व दर्जेदार करण्याची मागणी करण्यात आली. कोळसा वाहतुकीमुळे होणारे धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी टायर वॉशिंग, ताडपत्रीचा अनिवार्य वापर आणि पुलांची नियमित स्वच्छता करण्याचा मुद्दाही मांडण्यात आला.
उकणी खाण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खाण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन भविष्यात दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रकल्पबाधित गावांत नियमित आरोग्य शिबिरे, पुनर्वसित गावांत आरसीसी नाले, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मूलभूत सुविधा आणि स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही चर्चा झाली.
बैठकीत मांडलेल्या सर्व प्रश्नांचे अधिकृत कार्यवृत्त (Proceeding) तयार करून संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करावी आणि प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने मार्गी लावावेत, अशी मागणी आमदार देरकर यांनी केली.
बैठकीला जिल्हाप्रमुख संजय निखाडे, नगरसेवक सुधीर थेरे, नगरसेवक अजय धोबे, वणी शहरप्रमुख विनोद ढुमणे यांच्यासह रुपेश ठाकरे, विठ्ठल बोंडे, शंकर देरकर, प्रितम बोबडे, जितेंद्र बोंडे, प्रवीण मांडवकर, मारोती परागे, सुमित बाभुळकर आदी उपस्थित होते.

No comments: