Latest News

Latest News
Loading...

ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीत चोरट्यांचा डल्ला; २०० मीटर तांब्याची केबल लंपास

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ यांच्या कार्यालयाला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत दरवाज्याचे कडी-कोंडे तोडून सुमारे २०० मीटर लांबीची तांब्याची इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी गणेश मानिकराव चौरे (वय ५८) हे ४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता रुग्णालय परिसरातील क्वॉर्टर्सची पाहणी करीत होते. त्यावेळी नव्याने बांधण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ यांच्या कार्यालयाकडे गेल्यावर दरवाज्याचे कडी-कोंडे तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.

चौरे यांनी आत जाऊन पाहणी केली असता, कार्यालयातील तिन्ही खोल्यांमध्ये बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वायरिंगचे स्विच बोर्डपासून प्लास्टिक पट्टे फोडून वायर कापण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच इलेक्ट्रिक तांब्याची केबलही गायब असल्याचे आढळले.

या प्रकाराची माहिती त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एन. सुलभेवार आणि इन्चार्ज अरुणा गुरनुले यांना दिली. त्यानंतर दोघांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान अंदाजे २०० मीटर तांब्याची इलेक्ट्रिक वायर, किंमत सुमारे १२ हजार ५०० रुपये, अज्ञात व्यक्तीने कापून चोरून नेल्याचे समोर आले.

दरम्यान, चोरी नेमकी कोणत्या वेळेत झाली, चोरट्यांनी रुग्णालय परिसरात प्रवेश कसा केला आणि या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे. याप्रकरणी गणेश चौरे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसएसच्या कलम ३०५(a), ३५२४(२), ३३१(३)(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयीन इमारतीतील विद्युत साहित्याची चोरी झाल्याने रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.