Latest News

Latest News
Loading...

‘मातोश्री’वर यवतमाळच्या सहकार विजयाची दखल; उद्धव ठाकरे यांची नवनिर्वाचित संचालकांशी चर्चा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. या यशाचा आनंद आणि नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करण्यासाठी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित संचालकांनी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पुढील कार्य व वाटचालीसाठी नवनिर्वाचित संचालकांनी पक्षप्रमुखांचे आशीर्वाद घेतले. मात्र, ही भेट केवळ सदिच्छांपुरती मर्यादित न राहता यवतमाळ जिल्ह्यातील आगामी राजकीय वाटचाल, पक्षसंघटनेची बांधणी आणि सहकार क्षेत्रातील पक्षाची भूमिका यावरही चर्चा झाली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील यश हे पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशाच्या बळावर जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासोबतच सहकार क्षेत्रातही प्रभावी काम करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार संजय देरकर आणि शिष्टमंडळाने यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील दुष्काळजन्य परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. शेतकऱ्यांच्या संकटावर गांभीर्याने चर्चा करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. कठीण काळात शिवसैनिक बळीराजाला साथ देतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या भेटीला शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत, संपर्कप्रमुख अनिल आगळे, नवनिर्वाचित संचालिका किरण देरकर, संचालक सुनील कातकडे, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, संजय निखाडे, प्रवीण शिंदे, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, अविनाश भुजबळराव, वणी तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, मारेगाव तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुट्टे आणि झरी तालुकाप्रमुख सतीश आदेवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील यशाचे संघटनात्मक बळात रूपांतर करून यवतमाळ जिल्ह्यात पक्षाची वाटचाल अधिक व्यापक करण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.